सिरोंचा तालुक्यातील शेतकरी संकटात, पिकांना मिळत नाही योग्य भाव
सिरोंचा तालुका हा तालुका शेतीसाठी प्रसिद्ध असून येथील शेतकरी विविध प्रकारची पिके घेतात. मिरची, धान, मका, मुग, बरबटी, कापूस, टरबूज यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन तालुक्यात केले जाते. वर्षभर कष्ट करून शेतकरी शेती पिकवतात, मात्र त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
सध्या प्रशासनाकडून फक्त धान खरेदी केली जाते. इतर पिकांसाठी शासकीय खरेदी केंद्र किंवा बाजार व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल कमी दरात विकावा लागत आहे. अनेक वेळा मिरची, मका, मुग, कापूस यांसारखी पिके मातीमोल भावात विकली जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
स्थानिक बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपला शेतमाल शेजारच्या तेलंगणा राज्यात घेऊन जावे लागत आहे. तेथे विक्री करताना वाहतूक खर्च, दलाल आणि इतर खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पन्न राहत नाही.
शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले असून धानासोबत इतर पिकांचीही शासकीय खरेदी सुरू करावी, हमीभाव द्यावा आणि शेतमालासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
