पेसा मोबिलायझर्सना न्याय द्या; पदे रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या – मा. डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे मागणी
अहेरी : राज्यातील आदिवासी भागांमध्ये पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत असलेल्या पेसा मोबिलायझर्सना अचानक कामावरून कमी करण्याचा शासनाचा निर्णय अन्यायकारक असून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मा. डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे करण्यात आली आहे.
सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेसा मोबिलायझर्स हे आदिवासी समाज आणि ग्रामसभा यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करत आहेत. ग्रामसभांचे सक्षमीकरण, शासनाच्या योजना गावपातळीपर्यंत पोहोचवणे, वनहक्क, पेसा कायदा, रोजगार व सामाजिक हक्कांबाबत जनजागृती करण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे. मात्र कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता शासनाने ही पदे रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हजारो कुटुंबांच्या रोजगारावर घाला घालणारा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे आदिवासी भागातील ग्रामसभांच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होणार असून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय तातडीने मागे घेऊन पेसा मोबिलायझर्सना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या निर्णयाच्या निषेधार्थ दिनांक ६ मे २०२५ रोजी पुणे येथील पंचायत राज संचालक कार्यालयासमोर राज्यस्तरीय आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांमधून शेकडो महिला पेसा मोबिलायझर्स सहभागी झाल्या होत्या.
यावेळी मा. डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी म्हणून या गंभीर प्रश्नात हस्तक्षेप करून केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा आणि पेसा मोबिलायझर्सना न्याय मिळवून द्यावा, अशी भावनिक मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
