हत्ती कॅम्पमध्ये पाणपोईचे लोकार्पण; पर्यटकांना “घोटभर थंड पाणी म्हणजे उन्हात सावलीचा आधार”
Triveni News express नेटवर्क
तालुक्यातील मौजा कमलापूर येथील प्रसिद्ध हत्ती कॅम्पमध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कडक उन्हाच्या झळांमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी ही पाणपोई म्हणजे “घोटभर थंड पाणी म्हणजे उन्हात सावलीचा आधार” ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
स्व. रामचंद्र तारिकोंडावार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला असून, त्याचे सौजन्य सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ ताटीकोंडावार यांचे होते. “स्वच्छ पाणी… आरोग्यदायी जीवन…” तसेच “पाणी वाचवा… जीवन वाचवा…” असा समाजप्रबोधनाचा संदेशही यावेळी देण्यात आला.
या पाणपोईचे उद्घाटन मा. तनुश्रीताई आत्राम (सिनेट सदस्य, गडचिरोली) यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. उद्घाटनानंतर त्यांनी हत्तीला खाद्यपदार्थ भरवून आनंद व्यक्त केला. उपस्थित पर्यटकांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाला संतोषजी ताटीकोंडावार, मंतय्याजी आत्राम, सांबय्याजी करपेत, संतोष बोम्मावार, सुदीप रंगुवार, स्नेहादीप आत्राम, महेश येन्नमवार, गौरेश गडमडे (वनपरिक्षेत्र अधिकारी, कमलापूर), पेंदोर सर (आर.ओ., कमलापूर वनपरिक्षेत्र), कैलास कोडापे, रजनिता लक्ष्मण मडावी (प्रशासक, ग्रामपंचायत कमलापूर), माया अशोक आईला, पूजा अनिल येडला आदी मान्यवर उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमामुळे हत्ती कॅम्प येथे येणाऱ्या पर्यटकांना आता स्वच्छ आणि थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली असून, पर्यावरण व सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.
