आई-वडिलांच्या कष्टाचे फळ; जानमपल्लीच्या सुपुत्र सपंतची PSI पदावर भरारी
गरीब शेतकरी कुटुंबातील मुलाने जिद्द, मेहनत आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाच्या बळावर मिळवले यश; गावात आनंदोत्सव
सिरोंचा तालुक्यातील दुर्गम व लहानशा जानमपल्ली गावातील सुपुत्र सपंत यांनी पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत यश संपादन करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान दिसून येत आहे.
सपंत यांचे आई-वडील हे शेतकरी असून, अत्यंत कठीण परिस्थितीत शेती आणि मजुरी करून त्यांनी मुलाचे शिक्षण पूर्ण केले. “आपल्या मुलाने मोठे व्हावे, समाजात नाव कमवावे,” या आशेने त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतले. वर्ष 2011 मध्ये सपंत यांची पोलीस विभागात भरती झाली होती. मात्र, एवढ्यावर समाधान न मानता त्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवले.
आई-वडिलांच्या संघर्षाची जाणीव मनात ठेवून, “माझ्या जन्मदात्यांचे नाव मोठे करायचे,” या उद्देशाने सपंत यांनी PSI परीक्षेची तयारी सुरू ठेवली. अखेर त्यांच्या अथक परिश्रमांना यश मिळाले आणि त्यांनी PSI परीक्षा उत्तीर्ण करून कुटुंबासह संपूर्ण गावाचा मान उंचावला.
ही आनंदाची बातमी गावात पोहोचताच जानमपल्ली गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. गावकऱ्यांनी सपंत यांचे अभिनंदन करत त्यांच्या यशाचा अभिमान व्यक्त केला.
याच पार्श्वभूमीवर जानमपल्ली ग्रामपंचायतीच्या वतीने सपंत यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच मा. नागराजु गणपती उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपसरपंच मा. नागराजु गणपती यांच्या हस्ते सपंत तसेच त्यांच्या आई-वडिलांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी सपंत यांच्या यशाचे कौतुक करत, “हे यश केवळ एका मुलाचे नसून आई-वडिलांच्या त्याग, मेहनत आणि संस्कारांचे फळ आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.
सपंत यांच्या यशामुळे जानमपल्ली गावातील युवकांनाही नवी प्रेरणा मिळाली असून, कठीण परिस्थितीतही जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मोठे यश मिळवता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
