सिरोंचा : टेकडाताल्ला – कांबलपेठा मार्गावरील अट्टीवागू नाल्यावरील रखडलेल्या पुलाच्या प्रश्नावर अखेर टेकडा भागातील जनतेचा संताप अनावर झाला असून तब्बल ३० गावांतील नागरिकांनी आज सिरोंचा तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण छेडत शासनाविरोधात जोरदार हल्लाबोल केला. गेल्या दीड वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून असलेल्या पुलामुळे नागरिकांचे हाल होत असताना प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
अट्टीवागू नाल्यावरील पुलाचे बांधकाम दोन ते तीन वर्षांपूर्वी मंजूर झाले होते. मोठ्या गाजावाजात कामाला सुरुवातही करण्यात आली; मात्र काही महिन्यांतच ठेकेदार आणि संबंधित विभागाने काम अर्धवट सोडून दिले. आज पुलाच्या ठिकाणी अपूर्ण बांधकाम, पडझड आणि निष्काळजीपणाचे चित्र दिसत असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
हा मार्ग टेकडा भागातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी मानला जातो. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना, उपचारासाठी रुग्णांना, शेतकऱ्यांना बाजारपेठेसाठी तसेच सामान्य नागरिकांना दैनंदिन कामांसाठी याच मार्गाचा आधार घ्यावा लागतो. मात्र पुलाचे काम रखडल्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे यासाठी अनेकवेळा संबंधित विभाग, तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदने देण्यात आली होती. मात्र प्रशासनाने केवळ आश्वासने देत वेळकाढूपणा केल्याचा संताप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, काही दिवसांत मान्सून सुरू होणार असल्याने अट्टीवागू नाल्यावर पाण्याची पातळी वाढून हा मार्ग पूर्णपणे बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टेकडा परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि असंतोषाचे वातावरण आहे.
याच पार्श्वभूमीवर ३० गावांतील नागरिकांनी एकत्र येत तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. आंदोलनस्थळी “पूल द्या नाहीतर रास्ता रोको”, “जनतेच्या जीवाशी खेळ बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
“जोपर्यंत पुलाचे काम प्रत्यक्ष सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा आक्रमक इशारा आंदोलनकर्त्यांनी शासन आणि प्रशासनाला दिला आहे. टेकडा भागातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला असून आता शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
