करण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा) तर्फे तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
भाकपाचे सिरोंचा तालुका सचिव तथा AIYF महाराष्ट्र राज्य पदाधिकारी कॉ. रवि बारसागंडी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. “शेतकऱ्यांचे धान तयार आहे, मात्र शासन झोपेत आहे,” असा घणाघात यावेळी करण्यात आला.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. धान साठवणुकीची समस्या, वाहतुकीचा वाढता खर्च आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. शासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांच्या दारात कमी दरात धान विकण्याची वेळ येत असल्याचा आरोप भाकपाने केला आहे.
“शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळाला नाही तर सरकारच्या घोषणा फक्त कागदावरच राहतील,” असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला.
मेडारम, नारायणपूर, अमरावती, कारसपाल्ली आणि रंगायपल्ली येथे तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांचे धान शासनाने खरेदी करावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा आक्रमक इशारा भाकपाच्या वतीने देण्यात आला आहे.
सध्या तालुक्यातील शेतकरी शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले असून प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
