ई-पिक नोंदणीच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक बंद करा; रखडलेले धान चुकारे तात्काळ द्या — तहसीलदारांना निवेदन
नेटवर्क अभावी शेतकरी योजनांपासून वंचित; पीक कर्जावरही टांगती तलवार… प्रशासनाविरोधात संताप वाढला
सिरोंचा : ई-पिक नोंदणी नसल्याच्या कारणावरून दुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना पीक कर्ज व शासकीय योजनांपासून वंचित ठेवले जात असल्याच्या निषेधार्थ तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधत रखडलेले धान चुकारे तात्काळ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन २०२४-२५ खरीप हंगामातील ई-पिक नोंदणी प्रक्रिया नेटवर्क अभावी पूर्ण होऊ शकली नाही. सिरोंचा तालुक्यासह दुर्गम आणि आदिवासी भागातील अनेक गावांमध्ये इंटरनेट व मोबाईल नेटवर्कची गंभीर समस्या असल्यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
दरम्यान, विधानसभेत अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी ई-पिक नोंदणी नसली तरी शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांकडून धान खरेदी केले. मात्र आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांचे धान चुकारे प्रलंबित असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
याशिवाय, अनेक बँकांकडून ई-पिक नोंदणी नसल्यास पीक कर्ज मंजूर केले जाणार नाही, अशी भूमिका घेतली जात असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. आगामी खरीप हंगामासाठी बियाणे, खते, औषधे व शेती मशागतीसाठी निधी उभारणे कठीण बनले असून शेतकरी चिंतेत आहेत.
“नेटवर्क नसणे ही शेतकऱ्यांची चूक नाही, मग त्यांना योजनांपासून व कर्जापासून वंचित का ठेवले जाते?” असा सवाल उपस्थित करत शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनाद्वारे ई-पिक नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांनाही पीक कर्ज मंजूर करण्याचे निर्देश सर्व बँकांना द्यावेत, रखडलेले धान चुकारे तात्काळ वितरित करावेत, दुर्गम भागासाठी ई-पिक नोंदणीस विशेष सवलत द्यावी तसेच कोणताही पात्र शेतकरी ऑनलाईन प्रक्रियेमुळे योजनांपासून वंचित राहणार नाही याबाबत स्पष्ट आदेश जारी करावेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
सध्या खरीप हंगाम तोंडावर असताना प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
