उष्णतेचा कहर; सिरोंचात ३०० ते ४०० वटवाघुळांचा मृत्यू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात वाढलेल्या तीव्र उष्णतेचा फटका आता मानवांसोबतच वन्यजीवांनाही बसत असल्याचे चित्र समोर आले आहे. तालुक्यातील सिरोंचा शहरात मोठ्या प्रमाणात वटवाघुळे मृतावस्थेत आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
सिरोंचा शहरात पूर्वी दोन ठिकाणी वटवाघुळांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य होते. एक ठिकाण म्हणजे न्यायालय परिसर तर दुसरे वनविभाग विश्रामगृह परिसर व जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूस असलेली जुनी चिंचेची झाडे. न्यायालय परिसरात नवीन इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर त्या ठिकाणचे वटवाघुळांचे वास्तव्य सपंले मात्र वनविभाग विश्रामगृह परिसरातील चिंचेच्या झाडांवर अजूनही हजारो वटवाघुळे वास्तव्यास आहेत.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असून उष्णतेचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेल्याने वटवाघुळांवर त्याचा गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. चिंचेच्या झाडाखाली जवळपास ३०० ते ४०० वटवाघुळे मृतावस्थेत पडलेली आढळून आली असून सुमारे १५० ते २०० वटवाघुळे अजूनही झाडांवर लटकलेल्या अवस्थेत दिसत आहेत.
या घटनेमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून तेथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असतानाही सिरोंचा नगरपंचायतीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या वर्षीच्या प्रचंड उष्णतेचा फटका केवळ माणसांनाच नव्हे तर प्राणी व पक्ष्यांनाही बसत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत असून पर्यावरणप्रेमी आणि पक्षीमित्रांनी चिंता व्यक्त केली आहे.
