“मुख्यमंत्र्यांचा थेट फोन अन् आंदोलनाचा विजय!” अट्टीवागू पुलासाठी उपोषणाला यश; देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
सिरोंचा तालुक्यातील टेकडाताल्ला–कंबालपेठा मार्गावरील अट्टीवागू नाल्यावरील रखडलेल्या पुलाच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषण आंदोलनाला अवघ्या दुसऱ्याच दिवशी मोठे यश मिळाले. आंदोलनाची दखल थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी घेत आंदोलनकर्त्यांशी भ्रमणध्वनीवरून थेट संवाद साधला. “तात्काळ निधी उपलब्ध करून देत संबंधित विभागाला पुलाचे काम सुरू करण्याचे आदेश देणार,” असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
सिरोंचा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाला परिसरातील तब्बल ३० गावांतील नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला होता. मागील दीड वर्षांपासून पुलाचे काम अर्धवट अवस्थेत पडून असल्याने पावसाळ्यात संपूर्ण परिसर संपर्कबाह्य होण्याची भीती निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णांची वाहतूक आणि गावागावांतील दळणवळण व्यवस्था ठप्प होण्याच्या संकटामुळे नागरिकांनी अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता.
दरम्यान, आंदोलनाची बातमी News18 Marathi वर झळकताच राज्यभर या प्रश्नाची चर्चा रंगली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. मुख्यमंत्री स्वतः संवाद साधत असल्याचे समजताच आंदोलनस्थळी एकच जल्लोष उसळला. “आमच्या सारख्या अतिदुर्गम भागातील लोकांचे प्रश्न थेट ऐकणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत,” अशा भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या.
या संपूर्ण घडामोडीत ज्येष्ठ पत्रकार Mahesh Tiwari यांनी महत्त्वाची मध्यस्थीची भूमिका बजावल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. शासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संवाद घडवून आणण्यात त्यांच्या प्रयत्नांची भूमिका निर्णायक ठरल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या भावना अक्षरशः ओसंडून वाहिल्या. “आम्ही राज्याच्या शेवटच्या टोकावर राहणारे लोक आहोत. आमच्या अडचणी समजून घेऊन मुख्यमंत्री थेट फोनवर बोलले, हे आमच्या भागाचे भाग्य आहे. जर राज्याला असेच संवेदनशील नेतृत्व लाभले, तर दुर्गम भाग कधीच विकासापासून वंचित राहणार नाही,” अशा भावनिक शब्दांत आंदोलनकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी प्रभारी तहसीलदार म्हणून कार्यभार सांभाळणारे नायब तहसीलदार हलामी साहेब, निवासी नायब तहसीलदार सिडाम साहेब, भाजपचे माजी जिल्हा सचिव संदीप राचर्लावार तसेच व्यापारी आघाडीचे अध्यक्ष रवि चकिनारापुवर यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना लिंबूपाणी देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.
आता मुख्यमंत्र्यांच्या शब्दानंतर प्रत्यक्षात पुलाचे रखडलेले काम किती वेगाने सुरू होते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.