पेंडलया येथे तेंदूपत्ता मजुरांवर वीज कोसळली; एकाचा मृत्यू, दोघांवर उपचार सुरू
सिरोंचा तालुक्यातील पेंडलया परिसरात आज सायंकाळी तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू असताना अचानक आकाशातून वीज कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. सायंकाळी साधारण पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान तीन मजुरांवर वीज पडल्याने ते गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर जखमींना तात्काळ उपचारासाठी भोपालपटनम येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान जगदीश मांदळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उर्वरित दोन मजुरांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर सध्या भोपालपटनम शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, हे तिन्ही मजूर चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. घटनेच्या वेळी गावाचे माजी उपसरपंच मल्लेश दुर्गम हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनाही विजेचा सौम्य झटका बसला असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास व कारवाई पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
