कंबालपेठा–मदाराम रोड बनला मृत्यूचा सापळा; खड्डे चुकवताना वाहनचालकांचा जीव मुठीत
“रस्ता आहे की खड्ड्यांचं शेत?” — नागरिकांचा संताप अनावर
रवि बारसागंडी, सिरोंचा (गडचिरोली)
सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भागाला सिरोंचा–आलापल्ली महामार्गाशी जोडणारा कंबालपेठा–मदाराम मार्ग सध्या पूर्णपणे खड्डेमय बनला असून हा रस्ता आता नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालविणे कठीण झाले असून प्रत्येक प्रवास हा अक्षरशः जीव मुठीत धरून करावा लागत आहे.
रस्त्यावर एवढे खड्डे पडले आहेत की वाहन चालकांना खड्डे चुकवताना सर्कस करावी लागत आहे. दुचाकीस्वार कट मारत, वळण घेत वाहन चालवत असल्याने दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. अनेक वाहनधारक या रस्त्यावर घसरून जखमी झाले असून पावसाळ्याच्या तोंडावर परिस्थिती आणखी भीषण बनण्याची शक्यता आहे.
पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि अचानक वाहन खोल खड्ड्यात गेल्याने अपघाताचा धोका वाढत आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून विद्यार्थी, शेतकरी, रुग्णवाहिका तसेच रोजंदारी करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांचा प्रवास त्रासदायक आणि धोकादायक बनला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अवघ्या चार वर्षांपूर्वी या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. लाखो रुपयांचा निधी खर्च करून तयार करण्यात आलेला हा रस्ता एवढ्या कमी कालावधीत उखडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी तडे जाऊन खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
“रस्त्याचं काम झालं की फक्त बिलं काढली गेली?” असा संतप्त सवाल आता नागरिक प्रशासनाला विचारत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन कंबालपेठा–मदाराम मार्गाची पुढील पंधरा दिवसांत दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान, अपघात होऊन मोठी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागं होणार का? असा संतप्त प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत.