मादारम ग्रामपंचायतीत जल जीवन मिशन कोलमडलं; लाखोंची योजना कागदावरच, नागरिकांचा संताप अनावर
“फलकावर ‘हर घर जल’ लिहिलंय… पण गावातल्या घागर अजूनही कोरड्याच आहेत!”
सिरोंचा तालुक्यातील मादारम ग्रामपंचायतीमध्ये सन 2022-2023 दरम्यान जल जीवन मिशन अंतर्गत लाखो रुपयांचा पाणीपुरवठा प्रकल्प उभारण्यात आला. शासनाच्या “हर घर जल” या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत गावात पाणी टाकी, मोटार, पाइपलाइन आणि इतर सुविधा उभारण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात आजही गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने शासनाच्या योजनांचा फज्जा उडाल्याचे चित्र समोर आले आहे.
उन्हाच्या कडक झळांमध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांना दूरवरून पाणी आणावे लागत असून ग्रामस्थांचे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत. लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारलेली योजना आज बंद अवस्थेत पडून आहे. गावात उभारण्यात आलेली पाणी टाकी आणि शासनाचे फलक हे फक्त फोटो काढण्यापुरते उरले असून नागरिकांच्या घरात मात्र पाण्याचा एक थेंबही पोहोचत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प आहे. याबाबत संबंधित विभाग, ग्रामपंचायत प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे आणि देखभालीअभावी शासनाची लाखोंची योजना अक्षरशः धुळखात पडली आहे.
“शासन योजना काढतं जनतेसाठी… पण अधिकारीच जर झोपेत असतील तर गरीबांनी न्याय मागायचा कुणाकडे?” असा सवाल आता संतप्त ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
भाकपा सिरोंचा तालुका सचिव रवि बारसागंडी यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच मादारम गावातील बंद पाणीपुरवठा तात्काळ सुरू करून नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
दरम्यान, शासनाच्या योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना दुर्गम भागातील नागरिकांना अजूनही पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तरी संबंधित अधिकारी जागे होऊन मादारम गावातील नागरिकांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
