- “माणूस माणसाच्या कामाला येईना, पण मुक्या जीवांच्या डोळ्यातली तहान ओळखणारे अजूनही जिवंत आहेत…!”सागर मुलकला
उन्हाच्या तीव्र झळा आणि वाढत्या तापमानामुळे जंगलातील मुक्या प्राण्यांचे जगणं कठीण झालं आहे. नदी-नाले आटल्याने आणि जंगलात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने जंगली जनावरे तहान भागवण्यासाठी शेत, गाव आणि रस्त्यांकडे धाव घेत आहेत. याच दरम्यान अनेक प्राणी रस्ता ओलांडताना अपघाताचे बळी ठरत आहेत, तर काही शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकून आपला जीव गमावत आहेत.
आजच्या काळात माणूसच माणसाच्या मदतीला धावत नाही, तर या मुक्या जीवांचा विचार कोण करणार? जनावरांना भूक-तहान लागते, वेदना होतात; पण त्या बोलून दाखवण्याची ताकद त्यांच्याकडे नसते. त्यांच्या डोळ्यातली तगमग समजून घेणं, हीच खरी माणुसकी आहे.
याच मानवतेच्या भावनेतून मुलकला फौंडेशन यांनी जंगल परिसरात प्लास्टिकच्या टबमध्ये पाणी भरून जंगली जनावरांच्या पाण्याची सोय करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या छोट्याशा प्रयत्नामुळे अनेक मुक्या जीवांना जीवदान मिळत असून, “जंगलातला जीवही आपलाच आहे,” हा संदेश समाजापर्यंत पोहोचत आहे.
हे काम खरंतर वनविभागाने सातत्याने करणं गरजेचं असलं, तरी कुणीतरी पुढाकार घेतला, हीच मोठी गोष्ट आहे. मुलकला फौंडेशनच्या या उपक्रमामुळे माणूस आणि निसर्ग यांच्यातील नातं अधिक घट्ट होत असून, संवेदनशील समाजाची ओळख निर्माण होत आहे.
तहानलेल्या जनावरांसाठी ठेवलेलं पाणी हे फक्त पाण्याचं टब नाही, तर ती माणुसकीची ओंजळ आहे… मुक्या जीवांच्या जगण्याला दिलेला आधार आहे.
