महासंघ व विजुक्टा संघटनेचे उपसंचालक नागपूर कार्यालयावर २५ जून रोजी धरणे आंदोलन; सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
विभागिय प्रतिनिधी :- घनश्याम बारसे
9284 144278
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या ऑनलाईन संचमान्यतेतील त्रुटी, वेतनासंबंधी निर्माण झालेल्या समस्या तसेच शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ महासंघ व विजुक्टा संघटनेच्या वतीने राज्यभर धरणे आंदोलनाची आखणी करण्यात आली आहे. नागपूर विभागातील आंदोलन २५ जून रोजी दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत उपसंचालक कार्यालय, नागपूर येथे आयोजित करण्यात आले असून, सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विजुक्टा महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर यांनी केले आहे.
यापूर्वीही ऑनलाईन संचमान्यतेच्या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले होते. मात्र, अद्यापही संचमान्यता प्रक्रिया समस्याग्रस्त व गुंतागुंतीची असल्याने अनेक शिक्षकांना अर्धवेतन, विनावेतन तसेच सेवेसंदर्भातील विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
विशेषतः CHB, Part Time, विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षकांपुढे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक शिक्षकांचे उपविषय गहाळ झाले असून वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अध्यापन कालावधी ४५ मिनिटांवरून ४० मिनिटे करण्यात आल्याने नवीन अडचणी निर्माण झाल्या आहेत. विज्ञान शाखेतील प्रात्यक्षिक बॅचची संख्या ३० गृहित धरल्यामुळेही शिक्षकांमध्ये नाराजी आहे.
काही ठिकाणी ऑनलाईन संचमान्यता मंजूर झाली असली तरी त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. भविष्यात याच संचमान्यतेच्या आधारे वेतन निश्चित होणार असल्याने हजारो शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रत्येक उपसंचालक कार्यालयासमोर वेगवेगळ्या तारखांना धरणे आंदोलन करण्यात येणार असून, ३० जून रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संचमान्यतेबाबत अडचणी असलेल्या शिक्षकांनी आपल्या जिल्हाध्यक्षांकडे आवश्यक माहिती व कागदपत्रे पाठवून समस्या मांडाव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी व ऑनलाईन संचमान्यता प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी सर्व शिक्षकांनी एकजुटीने आंदोलनात सहभागी होणे आवश्यक असल्याचे डॉ. अशोक गव्हाणकर यांनी सांगितले.
– प्रा. बारसे, अहेरी
