सीमेवरील नक्षलप्रभावित गरदेवाड्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्तीसगड सीमेवरील अतिसंवेदनशील गावात लसीकरण मोहीम शांततेत व यशस्वीरीत्या पार
गरदेवाडा | प्रतिनिधी गिरीश नरोटे
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानांतर्गत रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी मौजा गरदेवाडा येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. छत्तीसगड राज्याच्या सीमेवर व नक्षलप्रभावित अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळख असलेल्या या गावात आरोग्य विभागाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबवत लहान बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले.
या कार्यक्रमाला सीएचओ सौ. वैशाली नरोटी, एएनएम सौ. कुंदा परशुरामकर, आशा स्वयंसेविका सौ. सगुना महा, अंगणवाडी सेविका सौ. संगीता बांबोळे तसेच गावाच्या सरपंच सौ. चिमारी मासू कोडो यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पालकांना आवाहन करत ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब आवर्जून पाजावेत, असे सांगितले. पोलिओसारख्या गंभीर आजारावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी प्रत्येक बालकाचे लसीकरण अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नक्षलप्रभावित व दुर्गम भाग असूनही आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यदक्षतेने आपली जबाबदारी पार पाडत ही मोहीम पूर्णपणे शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि यशस्वी केली. गावकऱ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
“दोन थेंब प्रत्येक वेळी… पोलिओवर विजय दरवेळी!” या घोषवाक्याला साजेसा प्रतिसाद देत गरदेवाडा गावाने पुन्हा एकदा पोलिओमुक्त भारताच्या संकल्पाला भक्कम पाठिंबा दिला. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे दुर्गम आणि सीमेवरील भागातही राष्ट्रीय आरोग्य मोहिमा प्रभावीपणे राबविता येतात, याचे गरदेवाडा हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
