दुर्गंधी, साचलेले सांडपाणी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष; येमली ग्रामपंचायतीविरोधात नागरिकांचा संताप
भामरागड | प्रतिनिधी गिरीश नरोटे
येमली ग्रामपंचायत अंतर्गत मोजा मंगुटा येथील नाल्याची गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ साफसफाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व घाण साचून दुर्गंधी पसरत असून, याकडे ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा तक्रारी करूनही नाल्यातील गाळ व कचरा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाल्याचे सांडपाणी रस्त्यावर तसेच नागरिकांच्या अंगणात शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे डासांची वाढ, दुर्गंधी आणि विविध साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सध्या येमली ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले ग्रामसेवक श्री. राकेश अलोणे यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र, अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई न झाल्याने नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गावातील नाल्यांची तातडीने स्वच्छता करून साचलेला गाळ व कचरा हटवावा, तसेच भविष्यात नियमित साफसफाईची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही काही नागरिकां सतांप दिसुन येत आहे
येमली ग्रामपंचायतीचा कारभार अद्याप प्रलंबित; ग्रामसेवक बन्सोड यांची माहिती
येमली ग्रामपंचायतीचे सचिव आलोन हे रजेवर असल्याने ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदभार ग्रामसेवक बन्सोड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, पदभाराची संपूर्ण कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.
यासंदर्भात ग्रामसेवक बन्सोड यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “माझ्याकडे सुमारे दोन महिन्यांपूर्वी येमली ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. मात्र, सचिव आलोन यांनी अद्याप ग्रामपंचायतीचा संपूर्ण चार्ज (कारभार) माझ्याकडे सुपूर्द केलेला नाही. आलोन साहेबांकडून अधिकृतपणे चार्ज मिळाल्यानंतर गावातील प्रलंबित अडचणी व विकासकामांबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचा प्रयत्न करेन.”
येमली ग्रामपंचायतीतील प्रलंबित कामे, नागरिकांच्या तक्रारी आणि विकासकामे रखडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून, संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर पदभार हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
