पाहिल्याच पावसात बोरामपल्ली नाल्यावरील लोकवर्गणीतून बांधलेला रपटा वाहून; ग्रामस्थांचा संताप
सिरोंचा तालुक्यातील बोरामपल्ली नाल्यावरील लोकवर्गणीतून उभारण्यात आलेला रपटा यंदाच्या पहिल्याच पावसात आलेल्या पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांनी स्वतःच्या आर्थिक योगदानातून व श्रमदानातून उभारलेला हा रपटा काही दिवसांतच वाहून गेल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
रपटा वाहून गेल्यामुळे बोरामपल्लीसह परिसरातील गावांचा संपर्क तात्पुरता तुटला असून, दैनंदिन वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. शालेय विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी तसेच कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात घालून नाला ओलांडावा लागत आहे. दुचाकीस्वारांनाही मोठी कसरत करावी लागत असून अपघाताची भीती कायम आहे.
ग्रामस्थांच्या मते, लोकवर्गणीतून तात्पुरता रपटा उभारण्याची वेळ येणे हीच प्रशासनाच्या उदासीनतेची निशाणी आहे. दरवर्षी पावसाळ्यात हा प्रश्न निर्माण होत असतानाही संबंधित विभागाने आजपर्यंत कायमस्वरूपी पूल किंवा मजबूत रपटा उभारण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
या घटनेमुळे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीट पूल किंवा मजबूत रपट्याचे बांधकाम हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी केली आहे. तसेच पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरत्या पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात सिरोंचा तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) चे कार्यकर्ते रवि बारसागंडी यांनी प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
“दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांचे हाल होतात; आता तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी पूल उभारून या समस्येचा कायमचा निकाल लावावा,” अशी एकमुखी मागणी बोरामपल्ली परिसरातील नागरिकांनी केली आहे.
