“विकासाच्या गप्पा नको, आधी सुरक्षित रस्ते द्या!” – NH-353C च्या दुरावस्थेवरून संतोष ताटीकोंडावार यांचा शासनावर घणाघात
गडचिरोली | प्रतिनिधी
एकीकडे गडचिरोलीच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत, तर दुसरीकडे नागरिकांना सुरक्षित रस्ताही उपलब्ध नसल्याची संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी व्यक्त केली आहे. आलापल्ली–सिरोंचा (NH-353C) राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या चार ते सहा वर्षांपासून संथ गतीने सुरू असून अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ताटीकोंडावार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले की, “विकासाच्या घोषणा करून उपयोग नाही, आधी जनतेचे जीव वाचतील असे दर्जेदार रस्ते द्या.” सुमारे 100 किलोमीटर लांबीच्या आलापल्ली–सिरोंचा महामार्गावरील अपूर्ण कामामुळे शेकडो गावांतील हजारो नागरिक रोज जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. पावसाळ्यात तात्पुरते रस्ते वाहून जातात, मोठमोठे खड्डे, चिखल आणि अपूर्ण पूल यामुळे वाहतूक विस्कळीत होते. अनेकदा नागरिकांना चार-चार महिने पर्यायी मार्गाने हेलपाटे मारावे लागतात.
त्यांनी शासन आणि प्रशासनावर तीव्र टीका करत विचारले, “एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतरच शासन जागे होणार का?” गडचिरोलीचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री असतानाही जिल्ह्याच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
ताटीकोंडावार यांच्या प्रमुख मागण्या
NH-353C आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर तातडीने पूर्ण करावे.
पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी त्वरित प्रभावी उपाययोजना कराव्यात.
कामातील विलंब आणि निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकारी व संबंधित कंत्राटदारांवर कठोर फौजदारी कारवाई करावी.
चार वर्षांपासून सुरू असलेले काम आजही अपूर्ण असून, प्रत्येक पावसाळ्यात चार महिने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्ष कामातील दरीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, या प्रश्नाने शासन आणि प्रशासनाला मोठा धक्का बसल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
