सिरोंचा येथे गटशिक्षणाधिकारी पदी मा. किशोर चव्हाण यांनी पदभार स्वीकारला; बीआरसी कार्यालयात केंद्रप्रमुखांकडून जंगी सत्कार
सिरोंचा | प्रतिनिधी
सिरोंचा पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागात आज महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदल झाला असून, नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी (BEO) मा. किशोर चव्हाण यांनी आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. त्यांच्या आगमनाने तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निमित्ताने सिरोंचा येथील बीआरसी (ब्लॉक रिसोर्स सेंटर) कार्यालयात तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुखांच्या वतीने मा. किशोर चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करत आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मा. किशोर चव्हाण म्हणाले, “सिरोंचा हा दुर्गम तालुका असला तरी येथील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवणे, शाळांच्या पायाभूत सुविधा मजबूत करणे, शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडवणे आणि शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट राहील.”
या सत्कार कार्यक्रमाला तालुक्यातील केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी केंद्रप्रमुख अशफाक शेख यांनी बोलताना सांगितले की, “मा. किशोर चव्हाण यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा निश्चितच सिरोंचा तालुक्याच्या शैक्षणिक विकासाला मोठा फायदा होईल. त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील, असा आम्हाला विश्वास आहे.”
शिक्षण विभागातील या नव्या नेतृत्वामुळे तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थीहित आणि शाळांच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा शिक्षण वर्तुळातून व्यक्त होत आहे.
— त्रिवेणी न्यूज एक्सप्रेस | सिरोंचा
