एटापल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ची संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण बैठक
एटापल्ली (प्रतिनिधी): गिरीश नरोटे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री तथा आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी रविवारी (दि. ५ जुलै २०२६) भगवंतराव महाविद्यालय, एटापल्ली येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले.
बैठकीत तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर बी.एल.ए. (Booth Level Agent) नियुक्त करून पक्षाची बूथस्तरावरील यंत्रणा सक्षम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन विस्तार, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि पक्ष बळकटीसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे एटापल्ली तालुकाध्यक्ष श्री. संभाजी हिचामी, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. संजूभाऊ चरडुके यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी सभापती, उपसभापती, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पक्षाचे पदाधिकारी व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत प्रत्येक मतदान केंद्रावर सक्षम प्रतिनिधी नियुक्त करून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
