बेझूरपल्लीत पिण्याच्या पाण्याचा तीव्र प्रश्न; आदिवासी ग्रामस्थ दूषित पाणी पिण्यास मजबूर
सिरोंचा (प्रतिनिधी): शासन आदिवासी भागाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केल्याचा दावा करत असले, तरी सिरोंचा तालुक्यातील आदिवासीबहुल बेझूरपल्ली गावातील वास्तव या दाव्यांना छेद देणारे आहे.
गावातील नागरिक आजही स्वच्छ पिण्याच्या पाण्यापासून वंचित असून, दूषित पाणी पिऊन आपले जीवन जगत आहेत. गावातील बहुतांश कुटुंबांना हातपंप व नाल्यातील पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.
पावसाळ्यात हेच पाणी अधिक दूषित होत असल्याने अतिसार, ताप, पोटाचे विकार तसेच विविध जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे. तरीही संबंधित प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शासनाच्या विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यामध्ये मोठी दरी असल्याचे चित्र बेझूरपल्लीत दिसून येत आहे. मूलभूत सुविधांसाठी आजही आदिवासी नागरिकांना संघर्ष करावा लागत असून, तातडीने शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे.
