सिरोंच्यात मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात; नागरिकांना सहकार्याचे आवाहन
सिरोंचा (प्रतिनिधी)
भारत निवडणूक आयोग तसेच महाराष्ट्र राज्याचे व मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दि. 14 मे 2026 रोजी राज्यभर मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision) कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात दि. 20 जून ते 7 ऑक्टोबर 2026 या कालावधीत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात दि. 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदारांच्या घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र (Enumeration Form – EF) वितरित करीत असून ते निर्धारित कालमर्यादेत भरून घेत आहेत.
याच अनुषंगाने मतदान केंद्र क्रमांक 258 – सिरोंचा माल येथे मा. सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, सिरोंचा श्री. अजय सकुंदरवार, नायब तहसीलदार (निवडणूक) श्री. राजेश्वर मसराम, महसूल सहाय्यक (निवडणूक) श्री. धनराज जगताप, डेटा ऑपरेटर (निवडणूक) श्री. अजमतखान पठाण तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) श्री. श्रीनिवास मारगोनी यांच्या उपस्थितीत मतदारांच्या घरी जाऊन गणना प्रपत्रांचे वाटप करण्यात येत आहे.
यावेळी तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी सिरोंचा तालुक्यातील सर्व मतदारांना आवाहन केले आहे की, आपल्या मतदार यादीतील भाग क्रमांकानुसार नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे जाऊन स्वतःचा तसेच आपल्या कुटुंबातील सर्व पात्र मतदारांचा गणना प्रपत्र (Enumeration Form – EF) अचूकपणे भरून द्यावा आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेस सक्रिय सहकार्य करावे.
