‘विकासाच्या’ गप्पा आणि नेलगुंडा अंधारात! आठवडाभरापासून वीज गायब; रस्त्याअभावी नागरिकांचे हाल
भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावात वीज, रस्ता आणि मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न; शासनाच्या विकासाच्या दाव्यांवर नागरिकांचा संताप प्रतिनिधी:– गिरीश नरोटे
“गडचिरोली जिल्ह्याचा झपाट्याने विकास होत आहे, दुर्गम भागाचा चेहरामोहरा बदलत आहे,” असे दावे शासनाकडून सातत्याने केले जात असले, तरी प्रत्यक्ष वास्तव मात्र याच्या पूर्णपणे विरुद्ध असल्याचे चित्र भामरागड तालुक्यातील मौजा नेलगुंडा येथे पाहायला मिळत आहे.
तालुका मुख्यालयापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नेलगुंडा गावात गेल्या आठवडाभरापासून वीजपुरवठा पूर्णपणे खंडित आहे. विशेष म्हणजे, भारत सरकारने याच गावात नवीन पोलीस स्टेशन उभारले आहे; मात्र पोलीस स्टेशन असलेल्या गावालाच आठवडाभर वीज नसणे ही प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
पावसाळ्याचे दिवस सुरू असताना संपूर्ण गाव अंधारात बुडाले आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांना डासांचा प्रचंड त्रास, साप-विंचू यांची भीती आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा मोठा फटका बसत आहे. मोबाईल चार्जिंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दैनंदिन जीवन आणि शासकीय सेवा यावरही परिणाम झाला आहे.
इतकेच नव्हे, तर नेलगुंडा गावाकडे जाणारा मुख्य रस्तादेखील अद्याप पक्का नाही. पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि खराब रस्त्यामुळे गावाशी संपर्क साधणे कठीण बनते. विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठी दरी असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
नागरिकांचा प्रश्न आहे की, जर तालुक्यापासून अवघ्या १५ किलोमीटरवरील गावाची ही अवस्था असेल, तर आणखी दुर्गम भागातील परिस्थिती किती बिकट असेल? शासनाच्या विकासाच्या दाव्यांमध्ये नेलगुंडा गावाचा समावेश आहे का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
गेल्या आठवडाभरापासून वीजपुरवठा बंद असूनही संबंधित विभागाकडून तातडीने दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तसेच रस्त्याचा प्रश्नही अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
“गडचिरोली जिल्हा विकसित होत आहे,” असे सांगणाऱ्या शासनाने एकदा नेलगुंडा गावाची वस्तुस्थिती पाहावी. वीज नाही, पक्का रस्ता नाही, मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत; मग नेमका विकास कुठे झाला? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
नेलगुंडा येथील वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करावा, गावाकडे जाणारा मुख्य रस्ता पक्का करावा आणि मूलभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
