त्रिवेणी न्यूज एक्सप्रेस
आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; गडचिरोलीची जात पडताळणी समिती जिल्ह्यातच कायम
महाराष्ट्र अनुसूचित जमाती सल्लागार परिषदेच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय; आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थी, युवक व पट्टेधारकांना मोठा दिलासा
गडचिरोली | प्रतिनिधी
मुंबई येथील विधानभवनाच्या कॅबिनेट मिटिंग हॉलमध्ये ३ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र अनुसूचित जमाती सल्लागार परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व मागासवर्गीय समाजाच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आमदार तथा माजी मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला या बैठकीत मोठे यश मिळाले.
गडचिरोली येथील जात पडताळणी समिती किनवट येथे स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू असल्याने जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर विषयावर डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून समिती गडचिरोली जिल्ह्यातच कायम ठेवण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत शासनाने गडचिरोलीची जात पडताळणी समिती जिल्ह्यातच कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
या निर्णयामुळे आदिवासी व मागासवर्गीय समाजातील हजारो विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, शासकीय नोकरीसाठी अर्ज करणारे युवक तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जात पडताळणीसाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची आवश्यकता राहणार नसल्याने वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत होणार आहे.
बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी पट्टेधारकांसाठीही ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. अतिक्रमित जमिनीबाबत ज्यांच्याकडे सातबारा उतारा उपलब्ध आहे, अशा पात्र आदिवासी पट्टेधारकांना एका महिन्याच्या आत जमिनीची मालकी देण्यात येणार आहे. तसेच ज्या पट्टेधारकांकडे सातबारा उपलब्ध नाही, त्यांना सातबारा तयार करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
आदिवासी पट्टेधारकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावरही डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे दोन्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची भावना जिल्ह्यातील आदिवासी समाज, विद्यार्थी व नागरिकांकडून व्यक्त होत असून, या निर्णयांचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.
महत्त्वाचे निर्णय
✅ गडचिरोलीची जात पडताळणी समिती जिल्ह्यातच कायम.
✅ हजारो विद्यार्थी, युवक व नागरिकांना मोठा दिलासा.
✅ पात्र आदिवासी पट्टेधारकांना एका महिन्यात जमिनीची मालकी.
✅ सातबारा नसलेल्या प्रकरणांसाठी सहा महिन्यांची मुदत.
✅ डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश.
