आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करा; सौ. भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधि :- तिरुपती
दि. 07 जुलै 2026
आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 चे गेल्या सात वर्षांपासून रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्यात यावे तसेच पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या सौ. भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांनी अहेरीचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली.
निवेदनात त्यांनी नमूद केले की, आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील काम अत्यंत संथ गतीने सुरू असून अनेक ठिकाणी रस्ता अपूर्ण आहे. मोठमोठे खड्डे, चिखल आणि निकृष्ट अवस्थेतील रस्त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनत असून वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
या मार्गावरून दररोज रुग्णवाहिका, शालेय वाहने, प्रवासी बस, मालवाहतूक वाहने तसेच हजारो नागरिक प्रवास करत असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सौ. भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांनी संबंधित विभागाला निर्देश देऊन महामार्गावरील धोकादायक खड्डे त्वरित बुजविणे, पावसाळ्यात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती करणे, रखडलेले रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी विनंतीही त्यांनी केली.
यावेळी अहेरी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) श्रीनिवासजी विरगोनवार, अहेरी नगरपरिषदेचे नगरसेवक अमोलजी मुक्कावार, येल्ला येथील उपसरपंच दिवाकरजी उराडे, हिम्मा भैया शेख, सुमितभाऊ मोतकूरवार, नरेश राऊत तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
