नाली साफ… पण घाण रस्त्यावरच! ग्रामपंचायत हालेवारा प्रशासनाचा भोंगळ कारभार; वटेगट्टा ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ
(प्रतिनिधी): – गिरीश नरोठे
हलेवारा ग्रामपंचायत हालेवारा अंतर्गत येणाऱ्या मौजा वटेगट्टा गावात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. गावातील नाल्यांची साफसफाई करण्यात आली असली, तरी नाल्यातून काढलेला चिखल, घाण आणि कचरा थेट सीसी रस्त्यावर टाकून ठेवल्याने संपूर्ण गावात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हा कचरा आणि चिखल रस्त्यावरच पडून आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले असून, शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, नाली साफसफाईचे काम संबंधित ठेकेदाराकडून करण्यात आले; मात्र काढलेला कचरा आणि चिखल उचलण्याची तसदीही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने फक्त कागदोपत्री काम पूर्ण केल्याचे दाखवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
यापूर्वीही वटेगट्टा गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईपलाईनच्या समस्येबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र आजपर्यंत त्या समस्येचे निराकरण झालेले नाही. ग्रामसेवक श्री. कोठारे यांच्याकडे अनेक वेळा निवेदने व तक्रारी करूनही त्यांनी या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांचा सवाल आहे की, नाली साफ करून घाण रस्त्यावरच टाकायची असेल, तर अशा साफसफाईचा उपयोग तरी काय? शासनाचा निधी खर्च करूनही काम अर्धवट ठेवले जात असेल, तर संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
ग्रामस्थांची मागणी:
सीसी रस्त्यावर टाकलेला चिखल व कचरा तात्काळ हटवावा.
गावाची स्वच्छता करून निर्जंतुकीकरण करावे.
पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईपलाईन त्वरित दुरुस्त करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा.
निष्काळजी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
“स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणा एकीकडे, तर दुसरीकडे वटेगट्टा गावात रस्त्यावर सडणारा नालीचा कचरा… हीच का प्रशासनाची स्वच्छतेची व्याख्या?” असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
