सशक्त बचत गट… आत्मनिर्भर गडचिरोलीचा भक्कम पाया!”
सेवा महोत्सवानिमित्त गडचिरोलीत यशस्वी महिला बचत गटांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
गडचिरोली (विशेष प्रतिनिधी): गिरीश नरोटे
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा महोत्सव २०२६’ अंतर्गत गडचिरोली येथील कर्तव्य कक्ष कार्यालयात यशस्वी महिला बचत गट सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमप्रसंगी महिला बचत गटांशी संवाद साधताना, जिल्ह्यातील सुमारे ३,५०० बचत गट हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे आणि महिला सक्षमीकरणाचे मजबूत आधारस्तंभ असल्याचे सांगण्यात आले. शासनाच्या विविध योजना, मुद्रा कर्ज, लघुउद्योग व स्वयंरोजगाराच्या संधींचा अधिकाधिक लाभ घेऊन प्रत्येक बचत गटाने उद्योगाच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन आमदार डॉ. मिलिंद नारोटे यांनी केले.
बचत गटांकडे नाविन्यपूर्ण उद्योगाची कल्पना असल्यास ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन, पाठबळ आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण सदैव तत्पर असू, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. गडचिरोलीतील प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर व्हावी, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सेवा महोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला जात आहे. या सात दिवसांच्या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांचे आभार मानण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती:
याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्षा ॲड. प्रणोतीताई निंबोरकर, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, भाजप जिल्हा सचिव तथा नगरसेविका वर्षाताई शेडमाके, भाजप महिला मोर्चा शहराध्यक्षा सीमाताई कन्नमवार, प्रतिमाताई चौधरी, अर्चनाताई बोरकुटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
”भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.”
— डॉ. मिलिंद नारोटे (आमदार, गडचिरोली)
