कुरखेडा येथे बौद्ध वर्षावसानिमित्त १०० संविधान ग्रंथांचे मोफत वितरण
✍️ सुगत उराडे | तालुका प्रतिनिधी
कुरखेडा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, कुरखेडा आणि विश्वबोधी कराडे यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध वर्षावसानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बौद्ध विहारात भारतीय संविधानाच्या १०० प्रतींचे नागरिकांना मोफत वितरण करण्यात आले. संविधान जनजागृतीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भारतीय संविधान हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टी, अभ्यासपूर्ण विचार आणि अथक परिश्रमातून साकार झालेले लोकशाहीचे भक्कम अधिष्ठान आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची हमी देणाऱ्या संविधानातील मूल्ये समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावीत, तसेच संविधानाबाबत जागरूकता, कर्तव्यभावना आणि स्वाभिमान निर्माण व्हावा, या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे सचिव रोहित ढवळे, विश्वबोधी कराडे, जितेंद्र वालदे, नरेश नैताम, लालचंद धाबेकर, संजय दोनाडकर, प्रमोद खोब्रागडे, सिराज पठाण, मंगेश आदे, प्रियंका टेंभूर्णे, राजू टेंभूर्णे, साईनाथ सरदारे, सिंधूताई वैद्य, विनोद खोब्रागडे, राशी खोब्रागडे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून संविधानातील मूल्यांचा प्रसार करण्याबरोबरच समाजात संविधानाविषयी आदर, जागरूकता आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
