खोट्या कागदपत्रांद्वारे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करा: धनगर अधिकारी-कर्मचारी संघटनेचे जात पडताळणी समितीला निवेदन
गडचिरोली (प्रतिनिधी – सुगत उराडे):
खोटी व अपूर्ण कागदपत्रे सादर करून शासन, जात पडताळणी समिती तसेच न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी धनगर अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली येथे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनानुसार, ‘झाडे/झाडया’ या नावातील नामसाधर्म्याचा गैरफायदा घेऊन काही व्यक्ती भटक्या जमाती-क (NT-C) प्रवर्गातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा लाभ मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. शासनाच्या नियमांनुसार हे आरक्षण धनगर व तत्सम जातींसाठी राखीव असताना, तेलंगणा राज्यातून स्थलांतरित झालेल्या झाडे/झाडया समाजातील काही लोक महसूल विभागाची दिशाभूल करून जात प्रमाणपत्र मिळवत असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे.
धनगर समाजातील ‘झाडे’ आणि गडचिरोली-चंद्रपूर परिसरातील ‘झाडे, झाडया अथवा झाडे कुणबी’ समाज यांच्यात कोणतेही जातीय किंवा सामाजिक साम्य नाही. असे असतानाही केवळ नामसाधर्म्याचा आधार घेऊन आरक्षण लाटण्याचे प्रयत्न सुरू आहेत, याकडे संघटनेने लक्ष वेधले.
प्रमुख मागण्या:
न्यायालयीन लढा: अलीकडील न्यायालयीन निर्णयांच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणांमध्ये रिव्ह्यू पिटिशन किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात यावे.
सखोल चौकशी: चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे शासन किंवा न्यायालयाची दिशाभूल झाली आहे का, याची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत.
आरक्षणाचे संरक्षण: धनगर समाजाच्या हक्काच्या आरक्षणात होणारी बिगरहक्क घुसखोरी तातडीने रोखावी आणि भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात.
या निवेदनाच्या सादरीकरणाप्रसंगी धनगर अधिकारी-कर्मचारी संघटनेचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि समाजातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
