एटापल्ली (गडचिरोली): गिरीश नरोटे
महाराष्ट्र शासन एकीकडे ‘रस्ते आणि पुलांचे जाळे’ विणून ग्रामीण भागाचा विकास करत असल्याचा दावा
ग्रामीण भागाचा विकास करत असल्याचा दावा करत असले, तरी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील ‘कचलेर’ आणि ‘कुकेली’ या दोन गावांच्या नशिबी मात्र अद्यापही तीव्र उपेक्षाच आली आहे. कचलेर ते कुकेली या अवघ्या ६ किलोमीटर अंतरादरम्यान रस्ताच उपलब्ध नाही; त्यातच दोन्ही गावांच्या मध्यभागी असलेला नाला पार करण्यासाठी साधा पूलही उभारण्यात आलेला नाही. रस्ता आणि पूल या दोन्ही मूलभूत सुविधांअभावी या भागातील नागरिकांना दैनंदिन ये-जा करण्यासाठी कमालीचा बिकट प्रवास करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कचलेर हे गाव हालेवारा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असून येथे श्री. कोठारे हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. तर दुसरीकडे कुकेली हे गाव सेवारी ग्रामपंचायतीअंतर्गत येत असून श्री. गेडाम हे तेथील ग्रामसेवक आहेत. स्थानिक नागरिकांचा असा गंभीर आरोप आहे की, दोन्ही गावांचे नागरिक कोणत्या भीषण परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत, हे पाहण्याची तसदी अद्याप एकाही ग्रामसेवकाने घेतलेली नाही. लोक अडचणींचा सामना करत असताना प्रशासकीय यंत्रणा आणि दोन्ही ग्रामसेवक मात्र गाढ झोपेत आहेत की काय, असा उद्विग्न सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी दोन्ही ग्रामसेवकांच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व दिलगिरी व्यक्त केली आहे.
पावसाळ्यात या नाल्याला पाणी आल्यावर दोन्ही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटतो. वैद्यकीय आणीबाणी किंवा दैनंदिन कामांसाठी जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. या भागाची बिकट अवस्था पाहता, संबंधित प्रशासकीय विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे आणि रस्ता व पुलाचे काम त्वरित मंजूर करून ग्रामस्थांची या नरकयातनेतून सुटका करावी, अशी आग्रही विनंती दोन्ही गावातील नागरिकांकडून केली जात आहे.
