गडचिरोलीतील पर्यावरणीय समस्यांबाबत विनोद मडावी यांचे CPCB, नवी दिल्ली येथे निवेदन
✍️ प्रतिनिधी :
गडचिरोली | दि. ४ ऑगस्ट : आझाद समाज पार्टी (काशीराम) गडचिरोलीचे जिल्हा प्रभारी विनोद गुरुदास मडावी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड व कोनसरी औद्योगिक तसेच खनन प्रकल्पांमुळे उद्भवू शकणाऱ्या पर्यावरणीय समस्यांकडे लक्ष वेधत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB), नवी दिल्ली येथे सविस्तर निवेदन सादर केले आहे.
३१ जुलै २०२६ रोजी CPCB कार्यालयाने या निवेदनाची अधिकृत प्राप्ती नोंदविली आहे. निवेदनात औद्योगिक सांडपाणी व्यवस्थापन, नद्या व जलस्रोतांचे संरक्षण, पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन तसेच स्थानिक आदिवासींचे आरोग्य, उपजीविका आणि पर्यावरणीय हक्कांचे संरक्षण यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात औद्योगिक सांडपाण्याची स्वतंत्र वैज्ञानिक तपासणी, ETP (Effluent Treatment Plant) आणि Zero Liquid Discharge (ZLD) प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी, पाणी गुणवत्तेची नियमित तपासणी, ऑनलाईन प्रदूषण निरीक्षण प्रणाली (OCEMS) सार्वजनिक करणे तसेच CPCB आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांच्या संयुक्त तपासणीची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, पर्यावरणीय मंजुरीतील अटींचे कठोर पालन, स्थानिक ग्रामसभा व नागरिकांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग आणि पर्यावरण संरक्षण कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी विनोद मडावी म्हणाले, “गडचिरोलीचा विकास हा पर्यावरण, जंगल, नद्या आणि आदिवासी समाजाच्या जीवनाशी तडजोड करून होऊ नये. शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे.”
या निवेदनामुळे गडचिरोलीतील पर्यावरणीय प्रश्न राष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
