निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! SIR प्रक्रियेस मुदतवाढ; नागरिकांना दिलासा
✍️ प्रतिनिधी : सुगत उराडे
गडचिरोली | दि. ५ ऑगस्ट : राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेस निवडणूक आयोगाने १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नवीन मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती, पत्ता बदल तसेच हरकती व दावे सादर करण्यासाठी नागरिकांना अतिरिक्त वेळ उपलब्ध झाला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार, बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांची घराघरांत जाऊन पडताळणी करण्याची मोहीम १७ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
प्रारूप मतदार यादीवर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हरकती व दावे स्वीकारले जाणार आहेत. प्राप्त अर्जांची छाननी, सुनावणी आणि निर्णय प्रक्रिया २२ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर आवश्यक दुरुस्त्या करून २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाणार आहे.
ज्या नागरिकांचे नाव अद्याप मतदार यादीत समाविष्ट झालेले नाही किंवा नाव, पत्ता, जन्मतारीख अथवा इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती करायची आहे, त्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन वेळेत अर्ज करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
तसेच, मतदार नोंदणी किंवा दुरुस्ती करताना खोटी माहिती अथवा चुकीची घोषणा करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचा इशाराही आयोगाने दिला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अचूक माहिती सादर करून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या तारखा
१७ ऑगस्ट २०२६ : SIR प्रक्रियेची अंतिम मुदत
२४ ऑगस्ट २०२६ : प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
२४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर : हरकती व दावे स्वीकारण्याचा कालावधी
२२ ऑक्टोबर २०२६ : अर्जांची छाननी व सुनावणी पूर्ण
२७ ऑक्टोबर २०२६ : अंतिम मतदार यादी प्रकाशित
