आलापल्लीच्या नागमाता मंदिरात नागपंचमीला भाविकांचा महापूर; हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली अक्का आत्राम यांच्या हस्ते महापूजा व महाप्रसाद वाटप
प्रतिनिधी तिरुपति मडावी
अहेरी : श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी आलेल्या पवित्र नागपंचमीच्या पर्वानिमित्त आलापल्ली येथील प्रसिद्ध नागमाता मंदिरात भक्ती आणि श्रद्धेचा अभूतपूर्व सोहळा रंगला. आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या मंदिरात पहाटेपासूनच दक्षिण गडचिरोलीसह परिसरातील विविध गावांमधून हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. भाविकांच्या प्रचंड उपस्थितीमुळे संपूर्ण मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
या पावन पर्वाचे औचित्य साधून युवानेते हर्षवर्धन बाबा आत्राम आणि डॉ. मिताली अक्का आत्राम यांनी नागमाता मंदिरात विधिवत पूजा-अभिषेक करून नागदेवतेला दूध व नैवेद्य अर्पण केला. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
धार्मिक उत्साहाला उधाण
श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि नागपंचमी असा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह संचारला होता. सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी महिला, पुरुष आणि तरुणांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ‘नागदेवतेचा जयघोष’ आणि ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला, तर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे सुंदर वातावरण पाहायला मिळाले.
हर्षवर्धन बाबा व डॉ. मिताली अक्का आत्राम यांच्याकडून महाप्रसाद
भाविकांची गैरसोय होऊ नये आणि दूरवरून आलेल्या भाविकांना सेवा मिळावी, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. युवानेते हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली अक्का आत्राम यांनी स्वतः उपस्थित राहून भाविकांना दूध व साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद वाटप केला. कार्यकर्त्यांच्या सहकार्याने गर्दीचे नियोजन करण्यात आल्याने भाविकांना सुलभ व शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावर, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, बालाजी गावडे, पराग पांढरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
नागमाता मंदिर राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये, तसेच भाविकांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस दल आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या समन्वयातून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आली.
नागपंचमीच्या निमित्ताने दक्षिण गडचिरोलीतील हजारो भाविकांनी आलापल्लीच्या नागमाता मंदिरात हजेरी लावल्याने आलापल्ली परिसर श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने अक्षरशः फुलून गेला होता.
