जपतलाई सर्पदंशात मृत्युमुखी पडलेल्या दीपिका लकडा यांच्या परिवाराला आमदारांकडून एक लाखांची आर्थिक मदत
एटापल्ली : धानोरा तालुक्यातील जपतलाई शासकीय आश्रमशाळेत सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडलेल्या दीपिका एतवा लकडा (वय १२) यांच्या परिवाराला एटापल्ली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली.
दीपिका लकडा ही एटापल्ली तालुक्यातील जव्हेली खुर्द येथील रहिवासी असून, ती जपतलाई आश्रमशाळेत शिक्षण घेत होती. १० ऑगस्टच्या मध्यरात्री वसतिगृहात झोपेत असताना सर्पदंश झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
दीपिका ही जव्हेली खुर्द गावची रहिवासी असल्याने आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी एटापल्ली दौऱ्यादरम्यान तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी परिवाराला एक लाख रुपयांचा धनादेश देत आर्थिक मदत केली. तसेच या दुःखद प्रसंगी परिवाराच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचे आश्वासन देत कुटुंबीयांना धीर दिला.
दरम्यान, आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या सल्ल्यानुसार दीपिकाच्या अंत्यसंस्कारासाठी यापूर्वी डॉ. मिताली आत्राम यांनीही परिवाराला आर्थिक मदत केली होती.
या मदतीमुळे दुःखाच्या प्रसंगी लकडा परिवाराला काही प्रमाणात आधार मिळाला असून, स्थानिकांकडून आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या संवेदनशील भूमिकेचे कौतुक करण्यात येत आहे.
