नगरपंचायतीने फोगिंग न केल्यास लोकप्रतिनिधींच्या दारात ब्लीचिंग टाकून भीक मागू; सिरोंचात काँग्रेसचा टोकाचा इशारा
सिरोंचा:
शहरात वाढलेल्या डासांच्या प्रादुर्भावामुळे (थैमान) डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांची भीती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटूनही नगरपंचायत प्रशासनाने नियमित फोगिंग (धूर फवारणी) व स्वच्छता मोहीम न राबविल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या निष्क्रिय कारभाराविरोधात काँग्रेसच्या वतीने मा. मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सध्या पवित्र श्रावण मास सुरू असल्याने शहरातील प्रभू श्रीराम मंदिर, श्री विठ्ठलेश्वर मंदिर, श्री बालाजी मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, हनुमान मंदिर, पोचम्मा मंदिर यांसह विविध धार्मिक स्थळे व दर्गा परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सोशल मीडियावरून वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे सर्व मंदिर व दर्गा परिसर स्वच्छ करून ब्लीचिंग पावडर फवारणी आणि शहरात नियमित फोगिंग सुरू करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
आंदोलनाचा अनोखा इशारा
प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास प्रत्येक प्रभागातील नागरिकांकडून नगरपंचायतीच्या नावाने भीक मागितली जाईल. जमा झालेल्या पैशातून ब्लीचिंग पावडर खरेदी करून नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या घरासमोर ती टाकली जाईल. तसेच लोकप्रतिनिधींच्या परिसरात स्वतःहून फोगिंग करून त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली जाईल, असा इशारा काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे.
