सिरोंचात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फॉगिंग मशीनद्वारे फवारणी सुरू; नगराध्यक्ष पद्माताई भोगे यांच्या पाठपुराव्याला यश
सिरोंचा:
शहरात मागील काही दिवसांपासून वाढलेल्या डासांच्या प्रादुर्भावाची गंभीर दखल घेत सिरोंचा नगरपंचायतीच्या वतीने अखेर फॉगिंग मशीनद्वारे औषध फवारणीला सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन नगराध्यक्ष पद्माताई भोगे यांनी फॉगिंग सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.
मागील सुमारे २० दिवसांपासून सिरोंचा शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे नगराध्यक्ष पद्माताई भोगे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच शहरात तातडीने फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र, फॉगिंग मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही फवारणी सुरू होण्यास काहीसा विलंब झाला. तांत्रिक अडचण दूर होताच आता नगरपंचायतीने शहरातील विविध भागांत फॉगिंग फवारणीचे काम हाती घेतले आहे.
डम्पिंग ग्राऊंडची प्रत्यक्ष पाहणी व साफसफाई
फॉगिंगसोबतच शहरातील डम्पिंगच्या ठिकाणची नगराध्यक्ष पद्माताई भोगे यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. या परिसरात तातडीने स्वच्छता करण्याच्या कडक सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यानंतर प्रशासनाने ॲक्शन मोडमध्ये येत डम्पिंग परिसराच्या साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
‘नागरिकांचे आरोग्य हा राजकारणाचा विषय नाही’
दरम्यान, फॉगिंगसह विविध नागरी समस्यांवर विरोधकांनी निवेदन देऊन मागणी केली होती. यावर बोलताना नगराध्यक्ष भोगे म्हणाल्या, “नागरिकांच्या प्रश्नांसाठी कोणत्याही माध्यमातून मागणी होत असेल तर त्याचे नेहमीच स्वागत आहे. परंतु, फॉगिंगच्या मुद्द्यावर निवेदन येण्यापूर्वीपासूनच प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषय हा कोणत्याही राजकीय वादाचा मुद्दा न बनवता सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.”
तसेच पुढील पाच महिन्यांत शहरातील नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्याशी संबंधित मूलभूत प्रश्नांवर प्रशासनासोबत समन्वय साधून कामांना गती दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
फॉगिंग फवारणी सुरू झाल्यामुळे शहरातील नागरिकांना वाढत्या डासांच्या त्रासापासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, नगरपंचायतीच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
