अतिक्रमण हटवून फलक लावला, तरी सरकारी जमिनीवर पुन्हा शेती!
धर्मपुरी प्रभाग क्र. १७ मधील सर्वे क्र. १०० परिसराचा प्रकार; नगरपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा सवाल
सिरोंचा : नगरपंचायतीने अतिक्रमण हटवून ज्या जागेवर “ही जागा नगरपंचायतीच्या मालकीची असून सदर जागेवर कोणतेही अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल” असा स्पष्ट इशारा देणारा फलक लावला होता, त्याच जागेवर आता पुन्हा शेती करण्यात येत असल्याचे छायाचित्रांवरून दिसून येत आहे. त्यामुळे सिरोंचा नगरपंचायतीच्या अतिक्रमण विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
धर्मपुरी प्रभाग क्रमांक १७ मधील सर्वे क्रमांक १०० परिसरात हा प्रकार समोर आला आहे. या परिसरातील अंदाजे ६ ते ७ एकर जमिनीवरील अतिक्रमण नगरपंचायतीने सुमारे दोन वर्षांपूर्वी हटविले होते. त्यानंतर संबंधित जागेवर नगरपंचायतीच्या मालकीचा फलक लावून अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता.
मात्र, सध्या परिस्थिती वेगळीच दिसत आहे. पूर्वी अतिक्रमण हटविण्यात आलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात शेती करण्यात आली असून जमिनीची मशागत करून पिके घेण्यात आल्याचे प्रत्यक्ष छायाचित्रांतून स्पष्टपणे दिसते. विशेष म्हणजे नगरपंचायतीचा इशारा देणारा फलकही जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे.
फलकाचा इशारा राहिला, जमीन मात्र पुन्हा वापरात!
नगरपंचायतीने अतिक्रमण हटविले, फलक लावला आणि जमीन सुरक्षित असल्याचे गृहीत धरले; मात्र त्याच जागेवर पुन्हा शेती सुरू झाली असेल, तर अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईनंतर प्रशासनाने त्या जागेची देखरेख केली का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
दोन वर्षांपूर्वी अतिक्रमण हटविल्यानंतर आता पुन्हा जमिनीचा वापर सुरू होईपर्यंत नगरपंचायतीच्या संबंधित विभागाला याची माहिती कशी मिळाली नाही? प्रशासनाला माहिती होती तर कारवाई का झाली नाही? आणि माहिती नसेल तर सरकारी जमिनीच्या देखरेखीची जबाबदारी नेमकी कुणाची? असे सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
न्यायालयीन वाद असल्यास प्रशासनाने भूमिका स्पष्ट आहे का
सदर जमिनीच्या मालकीसंदर्भात नगरपंचायत आणि संबंधित व्यक्ती यांच्यात न्यायालयीन प्रकरण सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे या जमिनीच्या वापराबाबत न्यायालयाने कोणते आदेश दिले आहेत, संबंधित शेतीसाठी कोणती कायदेशीर परवानगी आहे का आणि नगरपंचायतीची अधिकृत भूमिका काय आहे, हे प्रशासनाने स्पष्ट करणे गरजेचे आहे.
न्यायालयीन प्रकरण सुरू असताना संबंधित जमिनीवर शेती सुरू झाली असल्यास त्याची अधिकृत नोंद घेऊन प्रशासनाने कायदेशीर बाबी तपासणे आवश्यक आहे.
स्थानिक नागरिकांचे प्रश्न
या ठिकाणी पुन्हा शेती सुरू झाल्याची माहिती स्थानिक नगरसेवक किंवा नगरसेविकेला होती का? माहिती असल्यास नगरपंचायत प्रशासनाला वेळीच कळविण्यात आले का? प्रशासनाला माहिती देऊनही कारवाई झाली नसेल तर त्यामागचे कारण काय? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत
अतिक्रमण हटवून सरकारी जमिनीचा फलक लावणे ही एक बाब; पण त्याच जमिनीवर पुन्हा अतिक्रमणसदृश वापर सुरू झाल्यानंतर तो रोखणे ही प्रशासनाची खरी जबाबदारी आहे.
आता सिरोंचा नगरपंचायतीचा अतिक्रमण विभाग या प्रकाराची दखल घेऊन प्रत्यक्ष कारवाई करणार की पुन्हा कागदोपत्रीच कारवाई सुरू राहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
“नगरपंचायतीने अतिक्रमण हटविले होते, फलकही लावला होता; मग त्याच जागेवर पुन्हा शेती सुरू होईपर्यंत प्रशासन झोपले होते का? सरकारी जमीन वाचविण्याची जबाबदारी नेमकी कुणाची?”
