भामरागडमध्ये सहा पात्र अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे वितरित
भामरागड : शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेला भामरागड येथे सुरुवात झाली असून, या प्रक्रियेंतर्गत सहा पात्र लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वितरित करण्यात आले. तहसील कार्यालयातील सभागृहात बुधवार, १९ ऑगस्ट रोजी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पट्टे प्रदान करण्यात आले.
महसूल व वन विभागाच्या २५ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार नगरपंचायत भामरागडमार्फत शासकीय जमिनीवरील पात्र अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पट्टेवाटप कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी शुभम पाटील, नगराध्यक्ष रमाई महाका, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत सोनवणे यांच्यासह महसूल व नगरपंचायत विभागातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रशासनाकडून उर्वरित अतिक्रमणधारकांनाही आवश्यक कागदपत्रांसह नगरपंचायत कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. पात्रता व शासनाच्या निकषांनुसार संबंधित प्रकरणांची तपासणी करून नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी अभिजीत सोनवणे यांनी सांगितले.
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या या प्रक्रियेमुळे पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा असून, शासनाच्या निकषांनुसार अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
