दोन महिने उलटले, तरी फिजिक्स-मॅथेमॅटिक्सच्या तासिका बंद!
राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची पाच पदे रिक्त;
प्रतिनिधि गिरीश नरोटे
१४० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात
आलापल्ली : नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन तब्बल दोन महिने उलटले, तरी आलापल्ली येथील राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्ससारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांच्या नियमित तासिका अद्याप सुरू झालेल्या नाहीत. महाविद्यालयातील शिक्षकांची तब्बल पाच पदे रिक्त असल्याने सुमारे १४० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप स्थानिक युवकांनी केला आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आलापल्लीतील जागरूक युवकांनी गुरुवारी महाविद्यालयात धडक देत प्राचार्यांना निवेदन सादर केले. रिक्त शिक्षक पदे तातडीने भरावीत, सर्व विषयांच्या नियमित तासिका सुरू कराव्यात तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची गैरसोय करणारी महाविद्यालयाची बदललेली वेळ पूर्ववत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महत्त्वाचे विषय शिकवणार कोण?
नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन जवळपास दोन महिने झाले असतानाही अकरावी आणि बारावीच्या फिजिक्स व मॅथेमॅटिक्स विषयांच्या तासिका सुरू झालेल्या नसल्याचा आरोप युवकांनी केला आहे. विशेषतः बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या पुढील उच्च शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. अशा निर्णायक टप्प्यावर महत्त्वाच्या विषयांचे अध्यापनच होत नसेल, तर विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी कशी करायची, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
१४० विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ कोणाचा?
महाविद्यालयात सुमारे १४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षकांची कमतरता आणि नियमित तासिका न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे युवकांचे म्हणणे आहे. शैक्षणिक सत्रातील दोन महत्त्वाचे महिने वाया गेल्यानंतरही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही का झाली नाही, असा सवाल आता पालक व विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
वेळ बदलल्याने बाहेरगावच्या विद्यार्थ्यांचे हाल
महाविद्यालयाची वेळ पूर्वी सकाळी ७ ते ११ अशी होती. मात्र विद्यार्थ्यांना पुरेशी पूर्वसूचना न देता वेळ सकाळी १० ते दुपारी २ करण्यात आल्याने बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविद्यालय सुटल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना आपल्या गावाकडे परतण्यासाठी वेळेत बस उपलब्ध होत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महाविद्यालयाची पूर्वीची वेळ पुन्हा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आठ दिवसांत तोडगा काढा; अन्यथा ‘कुलूप ठोकू’ आंदोलन!
शिक्षकांची व्यवस्था करून फिजिक्स, मॅथेमॅटिक्ससह सर्व विषयांच्या नियमित तासिका तातडीने सुरू कराव्यात आणि विद्यार्थ्यांच्या इतर समस्यांवर ठोस तोडगा काढावा, यासाठी युवकांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आठ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास महाविद्यालयाला कुलूप ठोकण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवकांनी दिला.
शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क असताना शिक्षकांची कमतरता आणि तासिका बंद राहण्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होत आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पाठवलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावरच प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पाणी फेरले जात असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
