गडचिरोलीतील आदिवासी तरुणाईला ‘आयएएस’चे स्वप्न दाखवणारी क्रांती!
नंदूभाऊ नरोटे यांच्या पुढाकाराने पेटली स्पर्धा परीक्षेची ज्योत; डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्या शिबिरांना विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद
गडचिरोली: प्रतिनिधि तिरुपति मडावी
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी आणि युवकांमधील न्यूनगंडाची भावना समूळ नष्ट करून त्यांना तत्पर, तेजस्वी आणि तपस्वी बनवण्याचा निर्धार ‘आदिवासी विद्यार्थी संघा’ने केला आहे. संघाचे सरसेनापती, सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) जिल्हा कार्यकारी अध्यक्ष नंदूभाऊ नरोटे यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा जनजागृतीची धडक मोहीम राबवली जात आहे. या उपक्रमाला गडचिरोलीतील आदिवासी तरुण-तरुणींचा प्रचंड आणि अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे.
विद्यार्थ्यांना सनदी अधिकारी बनण्याचे स्वप्न दाखवण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेची योग्य तयारी करून घेण्यासाठी ‘मिशन आयएएस’चे संचालक तथा प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक डॉ. प्राध्यापक नरेशचंद्र काठोळे यांच्या विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकूण २१ भव्य मार्गदर्शक कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या असून, या उपक्रमाचा यशस्वी प्रारंभ वडसा देसाईगंज येथून झाला.
दुर्गम भागातील आश्रमशाळा अन् वसतिगृहांमध्ये ‘मी आयएएस होणारच’चा निनाद
या व्यापक मोहिमेअंतर्गत वडसा, गडचिरोली, अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, कुरखेडा, कोरची आणि धानोरा या सर्व तालुक्यांमधील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहांमध्ये जनजागृती केली जात आहे. डॉ. नरेशचंद्र काठोळे हे स्वतः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असून त्यांच्यात स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, याचा आत्मविश्वास निर्माण करत आहेत.
आतापर्यंत पार पडलेली प्रमुख शिबिरे:
वडसा: २ यशस्वी कार्यशाळा
अहेरी तालुका: आश्रमशाळा गुड्डीगुडांम
सिरोंचा तालुका: शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बामणी, अनुदानित व शासकीय आश्रमशाळा सिरोंचा, तसेच शासकीय मुला-मुलींचे वसतिगृह
भामरागड तालुका: अनुदानित आश्रमशाळा मन्नेराजाराम, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल (ताडगाव), भगवंतराव अनुदानित आश्रमशाळा (भामरागड) आणि शासकीय माध्यमिक आश्रमशाळा (लाहेरी)
या सर्व ठिकाणी “मी आयएएस अधिकारी होणारच!” या विषयावर अत्यंत प्रभावी कार्यशाळा पार पडल्या असून, हजारो विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न फुलले आहे.
आदिवासी विद्यार्थी संघाने पिंजून काढला संपूर्ण जिल्हा
नंदूभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वात आदिवासी विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्हा अक्षरशः पिंजून काढला आहे. या दौऱ्यात नंदूभाऊ नरोटे व डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्यासोबत अहेरी तालुकाध्यक्ष नागेश मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष व आविस सल्लागार बांनाया जंगम, माजी जि. प. सभापती तथा आविस सल्लागार इंदरशाह मडावी, बालाजी ठाकरे, मदन वेलादी, मनोज ईस्टम, जेष्ठ पत्रकार सुरेंद्र अलोणे, एकनाथ रचावार, तिरुपती मडावी यांच्यासह अहेरी, सिरोंचा व भामरागड तालुक्यातील स्थानिक सरपंच आणि आविसचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडचिरोलीच्या दुर्गम भागातील ही जनजागृती मोहीम केवळ एक शिबीर न राहता, आदिवासी युवकांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे एक ‘सामाजिक आंदोलन’ ठरत आहे!
