जागतिक छायाचित्रण दिनी ‘कॅमेऱ्यापलीकडचा माणुसकीचा फोटो’!
सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप; ५० हून अधिक चिमुकल्यांना वही-पेनचे वाटप
सिरोंचा : जागतिक छायाचित्रण दिन केवळ कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुंदर क्षण टिपण्यापुरता मर्यादित न ठेवता, माणुसकीचा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देत सिरोंचा येथे आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.
जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून सिरोंचा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप, तसेच ५० हून अधिक लहान मुलांना वही-पेनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून गरजूंच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्यच या दिवसाचे खरे ‘छायाचित्र’ ठरले.
या सामाजिक उपक्रमाचे आयोजन गौतमी डिजिटलचे संचालक शिवकुमार मारगोनी यांच्या पुढाकारातून करण्यात आले. यावेळी महेश तोटा, महेश रल्लाबंडी, सुरज रंगुवार, संतोष डोंगरे, पोचना बोडेंकी, गंगाधर कंबगोनी, सुजल कम्मलवार, संजय येलम, साई पुल्ले, राजशेखर पासुला, नितीन कुम्मारी, तिरू करपेत, नरसिंह अल्लापू, चरण बोडेंकी आणि लक्ष्मण पासुला यांच्यासह मित्रमंडळी उपस्थित होती.
कॅमेऱ्याचा अँगल नव्हे, माणुसकीचा क्षण टिपला!
आजच्या काळात छायाचित्रण म्हणजे केवळ एखादा क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करणे नव्हे, तर त्या क्षणाला सामाजिक अर्थ देणेही आहे. याच भावनेतून या मित्रमंडळींनी जागतिक छायाचित्रण दिनी सामाजिक उपक्रम राबवून “कॅमेऱ्याच्या लेन्समधून जग पाहताना माणुसकीची नजरही जपली पाहिजे” असा संदेश दिला.
रुग्णांना फळवाटप करताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान आणि लहान मुलांच्या हातात वही-पेन मिळाल्यानंतर उमटलेला आनंदाचा भाव उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.
“काही लोक फक्त कॅमेऱ्याचा अँगल शोधतात; आम्ही मात्र माणसांच्या चेहऱ्यावरचे हसू आणि त्यांच्या आयुष्यातील सकारात्मक बदल टिपण्याचा प्रयत्न करतो,” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या आगळ्यावेगळ्या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, जागतिक छायाचित्रण दिनाला सामाजिक बांधिलकीची जोड देणारा हा उपक्रम सिरोंच्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
