अहेरी तालुक्यातील प्रलंबित रस्त्यांचे व येरमनार बेली ब्रिजचे काम त्वरित पूर्ण करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
प्रतिनिधी तिरुपति मडावी
अहेरी तालुक्यातील मौजा – येरमनार नाल्यावरील बेली ब्रिजचे अर्धवट राहिलेले बांधकाम आणि मौजा – कोरेपल्ली ते आसा गावापर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे यांनी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे.
या दोन्ही विकासकामांना मंजुरी मिळून ४ ते ५ वर्षांचा कालावधी लोटला असला, तरी प्रत्यक्ष काम अजूनही अपूर्णच आहे. सन २०२५ मधील विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात येरमनार बेली ब्रिजच्या बांधकामासाठी वाढीव निधी मंजूर करण्यात आला होता; तरीही प्रत्यक्ष कामाला गती मिळालेली नाही. परिणामी, या मार्गावर अवलंबून असलेल्या १० ते १२ गावांतील नागरिकांना व प्रवाशांना पावसाळ्यात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
निबंधनात नमूद केल्यानुसार, जर तांत्रिक अडचणींमुळे येरमनार नाल्यावर बेली ब्रिजचे बांधकाम पूर्ण करणे शक्य नसेल, तर त्या ठिकाणी नवीन सिमेंट स्लॅबच्या पुलाला (RCC Bridge) तातडीने मंजुरी देऊन काम पूर्ण करण्यात यावे, जेणेकरून स्थानिक ग्रामस्थांची वाहतुकीची अडचण दूर होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने आदेश द्यावेत, अशी विनंती बालाजी गावडे यांनी केली.
निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येररावार, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सलीम शेख यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
