मोसम आरोग्य केंद्र की कुत्र्यांचा अड्डा?
आरोग्य सेविकांच्या अनुपस्थितीने नागरिक त्रस्त; समस्या न सुटल्यास आरोग्य केंद्राला ताला ठोकण्याचा सालय्या कंबलवार यांचा इशारा
सिरोंचा प्रतिनिधी– सुरेश तिपट्टीवार
अहेरी तालुक्यातील कमलापूर आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या मौजा मोसम येथील आरोग्य केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, आरोग्य केंद्र परिसरात कुत्र्यांचा मुक्त वावर असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मोसम, नंदिगाव व झिमेला या तीन गावांतील नागरिकांना या आरोग्य केंद्राचा लाभ मिळणे अपेक्षित असताना नियमित आरोग्य सेवा मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या आरोग्य केंद्रात दोन आरोग्य सेविका (नर्स) आणि एक एमपीडब्ल्यू कर्मचारी कार्यरत असतानाही आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
देवलमरी ग्रामपंचायत सदस्य तथा राम राम महाराष्ट्र न्यूजचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी सालय्या कंबलवार यांनी या समस्येची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. आरोग्य सेविकांनी मोसम येथे स्थानिक राहून नागरिकांना नियमित सेवा द्यावी, अन्यथा समस्या तातडीने सोडवली नाही तर आरोग्य केंद्राला ताला ठोकण्याचा इशारा कंबलवार यांनी दिला आहे.
