गट्टेपल्लीत वाघाचा पुन्हा धुमाकूळ; हल्ल्यात बैल गंभीर जखमी, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
एटापल्ली: गिरीश नरोटे
तालुक्यातील गट्टेपल्ली गाव परिसरात रात्रीच्या सुमारास वाघाने धुमाकूळ घालत एका बैलावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात बैल गंभीर जखमी झाला असून परिसरातील पशुपालक आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गट्टेपल्ली गावाजवळील परिसरात रात्रीच्या वेळी वाघाने बैलाला लक्ष्य केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात बैलाच्या शरीरावर खोल आणि गंभीर जखमा झाल्या आहेत. सकाळी घटनास्थळी रक्ताचे थारोळे आणि वाघ-बैलामध्ये मोठा संघर्ष झाल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसून आल्या. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
पाच दिवसांत दुसरी घटना; वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे, याच गट्टेपल्ली परिसरात अवघ्या पाच दिवसांपूर्वी, म्हणजेच २४ सप्टेंबर २०२६ रोजीही अशीच वाघाच्या हल्ल्याची घटना घडली होती. एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा वाघाचे दर्शन आणि पशुधनावरील हल्ल्यामुळे नागरिक पुरते धास्तावले आहेत. लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे वनविभागाची गस्त आणि सुरक्षा व्यवस्थेवर गावकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तातडीने उपाययोजना करण्याची गावकऱ्यांची मागणी
सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने नागरिकांना रात्री-अपरात्री शेतावर किंवा गुरांच्या गोठ्याकडे जावे लागते. अशा वेळी वाघाच्या मुक्त संचारामुळे शेतकरी आणि गुराख्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून पशुपालकाला योग्य ती भरपाई द्यावी, तसेच या भागात नियमित गस्त वाढवून वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी गट्टेपल्ली येथील नागरिकांनी केली आहे.
