पोलीस बांधवांच्या मनगटावर बांधली विश्वासाची राखी
‘सावित्रीच्या लेकी’ व दक्षता समितीचा रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; एटापल्ली पोलिसांसोबत जपला बहीण-भावाचा स्नेहबंध
त्रिवेणी न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी : सुगत उराडे
दि. २८ ऑगस्ट २०२६
एटापल्ली : रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नसून, परस्परांच्या सुरक्षिततेची आणि विश्वासाची नाळ घट्ट करणारा सण आहे. याच भावनेतून सावित्रीच्या लेकी विकास संस्था व दक्षता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच एटापल्ली पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधनाचा भावपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी नव्याने नियुक्त झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी, उपविभागीय कार्यालय एटापल्ली, जि. गडचिरोली यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
सावित्रीच्या लेकी विकास संस्थेच्या अध्यक्ष पौर्णिमा श्रीरामवार, दक्षता समितीच्या अध्यक्ष सुनीताताई चांदेकर, तसेच छाया जेट्टी, मनीषा नाडमवार, ज्योतीताई पुडो आणि सरिता दवेरकोडावार यांनी रक्षाबंधनाच्या या उपक्रमात सहभाग घेतला.
यावेळी SDPO संतोष बर्गे, PSI पराग भिवापूरे, PSI ओंकार धनवे, QRT चे प्रभारी अधिकारी मछिंद्रजी नागरगोजे, तसेच नाईक साहेब, शिंदे साहेब यांच्यासह एटापल्ली पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी सण-उत्सवांच्या काळातही कर्तव्यावर राहून समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र सेवा बजावत असतात. त्यामुळे त्यांच्या मनगटावर बांधलेली राखी ही केवळ रेशमी धागा न राहता कर्तव्य, संरक्षण, विश्वास आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरली.
या उपक्रमातून महिला आणि पोलीस प्रशासन यांच्यातील स्नेह, विश्वास व आपुलकीचा सुंदर संदेश समाजासमोर आला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘तुम्ही समाजाचे रक्षण करता, आम्ही तुमच्या कर्तव्याला सलाम करतो’, अशी भावना या उपक्रमातून व्यक्त झाली.
