सिरोंचा तालुक्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप; अहेरी-नागेपल्ली परिसरातही जाणवले सौम्य धक्के प्राथमिक माहितीनुसार कोणतीही हानी नाही; नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता बाळगावी – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
गडचिरोली (विशेष प्रतिनिधी): उम
गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आज, ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४:३६ वाजेच्या सुमारास ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची अधिकृत नोंद झाली आहे. भूकंपाची खोली जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर असून, याचे केंद्र सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे.
या भूकंपाची तीव्रता सिरोंचा व्यतिरिक्त लगतच्या अहेरी तालुक्यातही जाणवली. अहेरी व नागेपल्ली परिसरातही नागरिकांना पहाटेच्या वेळी सौम्य धक्के बसल्याचे अहेरी तहसील प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जीवित किंवा वित्तहानी नाही
पहाटेच्या सुमारास धक्के बसल्याने अनेक नागरिक घराबाहेर पडले, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. स्थानिक प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे.
प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन
”भूकंपाचे धक्के अतिशय सौम्य स्वरूपाचे असल्याने नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये. सर्वांनी शांतता राखून आवश्यक ती दक्षता बाळगावी. सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर किंवा बिगर-अधिकृत संदेशांवर अजिबात विश्वास ठेवू नये. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे,” असे आवाहन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.