अहेरी येथे बससेवेच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे हाल; मानव विकास योजना ठरतेय निष्फळ
अहेरी (तालुका प्रतिनिधी – गिरीष नरोटे):
बाहेरगावाहून शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली मानव विकास योजना अहेरी तालुक्यात प्रशासकीय अनास्थेमुळे निष्फळ ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बससेवेच्या विस्कळीत नियोजनामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असून, त्यांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना बस पकडता यावी यासाठी शाळेतून अर्धा तास अगोदर सुट्टी दिली जाते. मात्र, सुट्टी झाल्यानंतरही तब्बल तीन तास उशिरा, म्हणजेच थेट रात्रीच्या वेळी आलापल्ली बसस्थानक परिसरात बस दाखल होते. यामुळे विद्यार्थ्यांना तासनतास बसस्थानकावर ताटकळत राहावे लागत आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा शैक्षणिक वेळ वाया जात असून घरी पोहोचण्यास विलंब होत आहे, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या अभ्यासावर आणि शैक्षणिक प्रगतीवर होत आहे.
सुरक्षेचा गंभीर प्रश्न आणि पालकांमध्ये भीती
रात्रीच्या वेळी बसस्थानक परिसरात ताटकळत राहावे लागत असल्याने विशेषतः विद्यार्थिनी आणि लहान विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अंधारात असुरक्षिततेची भावना व मानसिक ताण सहन करावा लागत असल्याने पालकांमध्येही तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. सावित्रीच्या लेकींना या योजनेचा लाभ मिळण्याऐवजी मनस्तापच अधिक सहन करावा लागत आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि सुरक्षितता लक्षात घेता ही बससेवा नियमित, वेळेवर आणि पुरेशा फेऱ्यांसह तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे. प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन मार्ग न काढल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आदिवासी विद्यार्थी एकता मंच (अहेरी विधानसभा क्षेत्र) चे युवा नेते कैलाशभाऊ कोरेत यांनी दिला आहे.
