दुपारी रुग्णांच्या मृत्यूवर भूमिका मांडली; सायंकाळी निलंबनाचा आदेश!
गडचिरोलीच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे निलंबित; विभागीय चौकशीचेही आदेश
सपांदक
गडचिरोली | दि. १६ सप्टेंबर
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा शिवाजी लहाडे यांच्यावर शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. पर्यवेक्षकीय जबाबदारी पार पाडताना अक्षम्य निष्काळजीपणा, दुर्लक्ष आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी त्यांच्याविरोधात निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, निलंबनाच्या आदेशाच्या काही तासांपूर्वीच डॉ. लहाडे यांनी रुग्णांच्या मृत्यूबाबत आपली भूमिका स्पष्ट करणारे स्टेटमेंट दिले होते. त्यामुळे दुपारच्या स्टेटमेंटनंतर सायंकाळी झालेली निलंबनाची कारवाई हा आरोग्य विभागात चर्चेचा विषय ठरला आहे.
दुपारी मृत्यूच्या कारणांवर मांडली भूमिका
डॉ. लहाडे यांनी बुधवारी दुपारी दिलेल्या निवेदनात वैद्यकीय उपचारादरम्यान होणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरवणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले.
वैद्यकीय विज्ञानाने मोठी प्रगती केली असली, तरी काही गंभीर आजार आणि वैद्यकीय गुंतागुंती अशा असतात की तज्ज्ञ डॉक्टरांनी उपलब्ध साधनसामग्री आणि वैद्यकीय ज्ञानाच्या आधारे शर्थीचे प्रयत्न करूनही रुग्णाला वाचवणे शक्य होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Meconium Aspiration, अचानक हृदयक्रिया बंद पडणे, अंतर्गत रक्तस्राव तसेच फुफ्फुसांचे गंभीर आजार यांसारख्या आकस्मिक परिस्थितींमध्ये डॉक्टर रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नशील असतात, असेही त्यांनी नमूद केले.
त्यांच्या मते, प्रत्येक दुर्दैवी मृत्यूनंतर डॉक्टरांनाच थेट जबाबदार धरण्याऐवजी संबंधित आजाराची तीव्रता, वैद्यकीय गुंतागुंत आणि परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे.
काही तासांतच शासनाचा निलंबन आदेश
दुपारी डॉ. लहाडे यांनी रुग्णांच्या मृत्यूबाबत आपली भूमिका मांडल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी शासनाकडून त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला. एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे गडचिरोलीच्या आरोग्य विभागात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.
मात्र, निलंबनाची कारवाई नेमक्या कोणत्या घटनांशी आणि कोणत्या प्रशासकीय निष्कर्षांशी संबंधित आहे, याबाबत अंतिम वस्तुस्थिती विभागीय चौकशीअंती स्पष्ट होणार आहे.
निलंबन काळात गोंदिया मुख्यालय
निलंबनाच्या कालावधीत डॉ. लहाडे यांचे मुख्यालय गोंदिया जिल्हा रुग्णालय निश्चित करण्यात आले आहे. सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील संबंधित तरतुदींनुसार निलंबन काळात खासगी नोकरी स्वीकारणे तसेच व्यापार अथवा उद्योगधंद्यात सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन झाल्यास ते गैरवर्तन मानले जाऊन नियमानुसार पुढील कारवाई केली जाऊ शकते, असेही शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
आता विभागीय चौकशीत डॉ. लहाडे यांच्यावरील आरोप, त्यामागील प्रशासकीय कारणे आणि संपूर्ण प्रकरणातील वस्तुस्थिती काय समोर येते, याकडे आरोग्य विभागासह गडचिरोलीकरांचे लक्ष लागले आहे.
