मंडळांना नगराध्यक्षा पद्माताई बोगे यांची भेट
अडचणी व स्वच्छतेची पाहणी; गणेश मंडळांना बक्षीस देत केले प्रोत्साहन
सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायत हद्दीत विविध ठिकाणी श्री गणेशाची विधिवत स्थापना करण्यात आली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा पद्माताई सतीश बोगे यांनी शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देऊन पाहणी केली.
यावेळी श्री राम सेना गणेश मंडळ, वाल्मिकी गणेश मंडळ आणि सार्वजनिक बाल गणेश मंडळ, सिरोंचा या मंडळांना नगराध्यक्षा पद्माताई सतीश बोगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक सतीश बोगे तसेच शहराध्यक्ष रवी सुलतान यांनी भेट दिली.
भेटीदरम्यान गणेश मंडळांच्या परिसरातील स्वच्छता, भाविकांसाठी उपलब्ध सुविधा तसेच मंडळांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत पाहणी करण्यात आली. गणेशोत्सव काळात परिसरात स्वच्छता राखणे, भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
गणेश मंडळांच्या कार्याचे कौतुक करत संबंधित मंडळांना बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्यात आले. नगराध्यक्षा म्हणून शहरातील गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि स्वच्छतेची पाहणी करणे, हे आपले कर्तव्य असल्याचे पद्माताई बोगे यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांनी सामाजिक सलोखा, शांतता आणि स्वच्छता राखत उत्सव साजरा करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
