जारावंडीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांचा एल्गार! वनहक्क पट्ट्यांसाठी मार्गदर्शन सभेला जनसमुदाय लोटला
अहेरी विधानसभा क्षेत्राचे रा.कां. अध्यक्ष लक्ष्मण येरावार यांची प्रमुख उपस्थिती; उपविभागीय अधिकाऱ्यांकडे वंचित शेतकऱ्यांची यादी सादर करणार
गडचिरोली / एटापल्ली (प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे):
मौजा जारावंडी येथे जारावंडी क्षेञातिल अतिक्रमणधारक शेतकरी बांधवांची एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भव्य सभा पार पडली. महसूल विभागामार्फत दिनांक १७ सप्टेंबर २०२६ ते ०२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना हक्काचे वनहक्क पट्टे मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी जारावंडीत या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेत वनहक्क प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कायदेशीर कागदपत्रांची सखोल माहिती देऊन शेतकरी बांधवांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेत एकही गरजू शेतकरी वंचित राहू नये, यासाठी सुटलेल्या उर्वरित सर्व अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची अचूक यादी तयार करून ती मा. उपविभागीय अधिकारी (SDO), एटापल्ली यांच्याकडे तातडीने सादर केली जाईल, असा ठाम निर्णय या वेळी घेण्यात आला.
या प्रसंगी अहेरी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्रीमान लक्ष्मणजी येरावार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. आपल्या रोखठोक भाषणात ते म्हणाले की, “वर्षानुवर्षे जमिनीवर घाम गाळणाऱ्या बळीराजाला त्याचा हक्क मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी प्रशासन स्तरावर सर्वतोपरी पाठपुरावा केला जाईल.”
तसेच सेवानिवृत्त अधिकारी श्री. वासुदेव कोडापे यांनीही प्रशासकीय प्रक्रिया आणि कागदपत्रांच्या तांत्रिक बाबींवर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या बैठकीस जारावंडीच्या प्रशासक सपनाताई कोडापे, घनश्याम नाईक (भापडा), मनिराम पावे (सिंदभट्टी) यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
